म.जा.न्युज नेटवर्क
एरंडोल – येथील पोलीस स्टेशन कर्मचारी बापू लोटन पाटील हा ३ हजाराची लाच स्विकारतांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाच्या जाळ्यात अडकला. त्यास लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर धुळे येथे नेण्यात आले असून ऐन दिवाळीत झालेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
एरंडोल पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात जप्त केलेली दुचाकी परत देण्याकरिता नुकत्याच काही महिन्यांपूर्वी जळगाव हून एरंडोल येथे बदली होऊन आलेला पोलीस हवालदार बापू लोटन पाटील याने म्हसवे ता.पारोळा येथील तक्रारदाराकडून पैशांची मागणी केली. विशेष म्हणजे तक्रारदार हा स्वतः अपघातात जबर जखमी झालेला असतांनाही त्याचे कडून पैशांची अवास्तव मागणी करण्यात आली. तडजोडी अंती ३ हजार रुपयात प्रकरण मिटविण्याचे ठरले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदार याने बापू पाटील याला दुरध्वनीद्वारे एरंडोल हायवे चौफुली येथे रक्कम घेण्यासाठी बोलावले. त्याप्रमाणे तक्रारदाराकडून बापू लोटन पाटील हा ३ हजार रुपयांची लाच स्विकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्या पथकाने त्याला ‘रंगेहाथ, पकडले.
जप्त केलेली दुचाकी परत मिळण्याकरिता पोलीस हवालदार बापू पाटील यास गयावया,विनंती करूनही त्याने पैशांसाठी जप्त केलेली दुचाकी परत देण्यास नकार दर्शविला व अवाजवी पैशांची मागणी केली त्यामुळे तक्रार दाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
याप्रकरणी रात्री उशीरा पर्यंत पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
