म.जा.न्युज नेटवर्क
जळगाव: वृद्धापकाळात मानसिक आरोग्याचे प्रश्न हा एक गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे. वयोमानानुसार शारीरिक बदलांसह मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. प्रवर्तन फाउंडेशन बोदवड कडून जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त 10 ऑक्टोबर ते 10नोव्हेबर महिनाभर मानसिक आरोग्यावर उपाययोजना आदींवर प्रकाश टाकणारे उपक्रम राबवण्यात आले. जळगाव येथील रामानंद नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक मंडळ या ठिकाणी ९नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात ज्येष्ठ नागरिक मंडळ चे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गुलाबराव बाविस्कर यांनी करून मार्गदर्शक पर संभाषण मानसोपचार समुपदेशक विजयेंद्र पालवे, डॉ.धर्मेश पालवे , विकास वाघ ,स्वप्नील वाघ यांनी जेष्ठांना मार्गदर्शन केले. समुपदेशक विकास वाघ यांनी वृद्धापकाळात जवळच्या व्यक्तींचा किंवा मित्रांचा मृत्यू, मुलं दूर राहणं, किंवा आरोग्याच्या समस्यांमुळे घरातच राहावं लागणं, यामुळे वृद्धांना एकटेपणाची भावना येऊ शकते. हा एकटेपणा पुढे नैराश्याला कारणीभूत ठरू शकतो. तसेच वयोमानाच्या वाढीसह, अनेक लोकांना नैराश्याचा सामना करावा लागतो. शारीरिक दुर्बलता, हळूहळू कार्यक्षमता कमी होणं, आर्थिक चिंता किंवा जवळच्या व्यक्तींच्या निधनामुळे मानसिक ताण निर्माण होतो. हे नैराश्य वृद्ध व्यक्तींच्या जीवनातील आनंदावर परिणाम करू शकते असे सांगितले. तर समुपदेशक विजयेंद्र पालवे यांनी वृद्धापकाळात अल्झायमर आणि डिमेंशिया यांसारख्या विस्मरणाशी संबंधित आजारांचं प्रमाण वाढू शकतं. यामुळे विस्मरणाशी संबंधित आजारांचं प्रमाण वाढू शकतं. यामुळे व्यक्तीच्या दैनंदिन कार्यांवर परिणाम होतो, आणि कुटुंबासाठीही ते आव्हानात्मक ठरू शकतं असे प्रतिपादन केले . त्याच बरोबर डॉ .धर्मेश पालवे यांनी वृद्ध वयात भविष्यातील अनिश्चितता, आर्थिक समस्या, आरोग्याच्या चिंता, किंवा शारीरिक दुर्बलतेची भीती, यामुळे चिंता विकार निर्माण होऊ शकतो. हे वृद्धांच्या झोपेवर, शारीरिक आरोग्यावर आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करू शकते.वृद्ध वयात झोपेचे चक्र बदलतं, आणि अनेकांना झोप न येणं, कमी झोप, किंवा सतत जाग येणं अशा समस्या येतात. झोप न येणं ही देखील मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारी बाब आहे आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काही उपाय सांगितले त्यात मुख्यत्वे
१. व्यायाम आणि योगाः नियमित व्यायाम आणि योगा वृद्ध व्यक्तींना मानसिक ताजेपणा आणि शारीरिक ऊर्जा मिळवून देऊ शकतो.
२. सामाजिक संपर्कः मित्र, कुटुंबातील सदस्य आणि समाजातील इतर वृद्ध व्यक्तींशी नियमित संवाद साधावा.
३. सकारात्मक दृष्टिकोनः सकारात्मक विचारांचा अभ्यास, ध्यानधारणा, आणि मनःशांती तंत्रांचा वापर करावा.
४. व्यवसाय किंवा छंदः वृद्धांनी त्यांच्या आवडीचे काही कार्य किंवा छंद जोपासणं आवश्यक आहे. आदी असे उपाय समजावून सांगितले.
सदर कार्यक्रमाला प्रवर्तन फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. दिव्या पालवे, अवचित पाटील, मधुकर पवार, श्रीमती. शालिनीताई खडके,लताताई सोनवणे, कमलबाई पालवे,भरत पाटील, छोटू देवरे व इतर नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता कवी डि.एस.सोनवणे यांनी भारतमातेचे अभिवादन गीत गाऊन केली. तसेच सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या अमूल्य अशा मानसिक आरोग्य माहिती पर शिबीराचा लाभ
घेतला .
