म. जा.न्युज नेटवर्क
एरंडोल: तालुक्यातील तळई येथील येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री. शंकरराव धनाजी पाटील यांचा ७५ वा अमृत महोत्सव हा केवळ जन्मदिनाचा उत्सव नव्हता, तर तो वडील–कन्या या नात्यातील न बोलता व्यक्त होणाऱ्या प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा हृदयस्पर्शी सोहळा ठरला. शब्द अपुरे पडावेत असा हा क्षण होता—जिथे भावना डोळ्यांतून वाहत होत्या आणि आठवणी हृदयात साठून राहिल्या.
जावई प्रा.डॉ. हेमंत मधुकर पाटील व मानस कन्या सौ. वैशाली हेमंत पाटील यांनी आपल्या पित्याचा अमृतमहोत्सव ज्या नितांत प्रेमाने, नतमस्तक होऊन साजरा केला, त्यातून एका लेकीची कृतज्ञता, मायेची सावली आणि आयुष्यभराची ऋणभावना प्रत्ययास आली. त्या प्रत्येक क्षणात गावातून निघालेली भव्य मिरवणूक केवळ उत्सवाची नव्हती, तर एका शिक्षकाने आयुष्यभर पेरलेल्या संस्कारांची साक्ष देणारी होती. आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून अनेक पिढ्यांना घडविणारे शंकरराव धनाजी पाटील आज सन्मानाच्या व्यासपीठावर होते. मान्यवरांच्या गौरवोद्गारांत त्यांच्या साधेपणा, शिस्तप्रियता आणि निःस्वार्थ सेवाभावाचे दर्शन घडत होते.
या भावनिक क्षणी त्यांच्या अर्धांगिनी नीलम शंकरराव पाटील (माजी शिक्षिका), मोठी बहीण विमलबाई पाटील, लहान बहीण सुशिलाबाई पाटील, मावस बहीण शकुंतलाबाई पाटील, भाऊ ओंकार धनाजी पाटील, शिवाजी धनाजी पाटील, तसेच वहिनी, पुतणे, पुतण्या, सुना आणि नातवंडांनी कुटुंबातील प्रेमाचे वलय अधिक घट्ट केले. तीन पिढ्यांचे नाते एकाच छत्राखाली, एकाच भावनेत एकवटले होते. याप्रसंगी जावई प्रा. डॉ. हेमंत मधुकर पाटील, मानस कन्या सौ. वैशाली हेमंत पाटील,पुतणी सविता पाटील तसेच नातू दिशांत पाटील व नात जीनल पाटील यांनी भावनिक मनोगतातून “आप्पा” या शब्दाचा अर्थ नव्याने उमलविला.
यावेळी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अमितदादा पाटील, त्यांचे बंधू अभिजीत पाटील, प्रा. मनोज पाटील सपत्नीक, डी.डी.एस.पी. महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापकवर्ग, माजीनगरसेवक राजेंद्र चौधरी, छायाताई दाभाडे, ज्ञानेश्वर आमले, वासुदेव पाटील, शालेय पोषण अधीक्षक जे.डी.पाटीलसाहेब , एरंडोल तालुक्यातील केंद्रप्रमुख, शिक्षक-शिक्षिका, तळई गावातील अधिकारी-पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, तळई माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच मित्रपरिवार, आप्तेष्ट आणि नातलगांनी उपस्थित राहून या क्षणांना साक्षीदार होण्याचा मान मिळवला.
‘भूतो न भविष्यति, साजरा केलेला हा अमृत महोत्सव सोहळा हास्य, आनंदाश्रू आणि आठवणींच्या संगमातून प्रत्येकाच्या मनात खोलवर कोरला गेला.या आनंदमयी सोहळ्यात गावपंगतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आनंदराव पाटील यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे अत्यंत ओघवते आणि भावनांना स्पर्श करणारे सूत्रसंचालन तळई माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शशिकांत पवार सर यांनी केले.
