


म.जा. न्युज नेटवर्क
जळगाव: “लेखणी आणि स्टेथोस्कोप” यांचं नातं तसं दुर्मिळच, पण जळगावच्या मातीने हे समीकरण सत्यात उतरवलं आहे.
रुग्णसेवेचं व्रत अंगीकारलेले डॉ.धर्मेश पालवे आता एका नव्या भूमिकेतून महाराष्ट्रासमोर येत आहेत.
सामाजिक आणि राजकीय विषयांवरील आपल्या सडेतोड लिखाणासाठी ओळखले जाणारे डॉ. धर्मेश पालवे आता एका मराठी लघुपटाची (Short Film) कथा लिहिणार असून, त्यांच्या या नव्या प्रवासाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
नंदगावची दोन रत्ने एकत्र : डॉ.धर्मेश पालवे आणि कुलवंतसिंह राजपूत यांचा ‘कुल्या’ या लघुपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील नांदगाव या एकाच गावची दोन प्रतिभावान व्यक्तिमत्त्वे या निमित्ताने एकत्र येत आहेत.
‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ आणि ‘सावधान इंडिया’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला हरहुन्नरी अभिनेता कुलवंतसिंह राजपूत या लघुपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून डॉ. पालवे यांच्या शब्दांची ताकद आणि कुलवंतसिंह यांचा सशक्त अभिनय यामुळे हा लघुपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
‘फिल्मसिटी सिने टी.व्ही.आर्टिस्ट संघ’ कडून अधिकृत मान्यता ते राष्ट्रीय स्तरावर दखल: डॉ. धर्मेश पालवे यांच्या लेखन कौशल्याची दखल घेत त्यांना ‘फिल्मसिटी सिने टी.व्ही.आर्टिस्ट अँड वर्कर्स संघ’ (मुंबई) कडून ‘स्क्रिप्ट रायटर’ (पटकथा / लघुपट लेखक) म्हणून अधिकृतरीत्या मान्यता देण्यात आली आहे. या नामांकित संस्थेचे सभासदत्व मिळणे हा कोणत्याही लेखकासाठी मानाचा तुरा मानला जातो. यामुळे त्यांच्या व्यावसायिक लेखणीवर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून, आगामी ५ वर्षांसाठी (२०२९ पर्यंत) त्यांना हे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा प्रवास: डॉ. पालवे हे पेशाने डॉक्टर असूनही त्यांचा पिंड एका संवेदनशील लेखकाचा आहे. समाजात घडणाऱ्या घडामोडींवर त्यांनी आजवर विविध वर्तमानपत्रांतून व सोशल मीडियावरून भाष्य केले आहे. आता व्यावसायिक पटकथा लेखनाच्या क्षेत्रात पदार्पण करून त्यांनी आपल्या अष्टपैलूत्वाची प्रचिती दिली आहे. बोदवड सारख्या ग्रामीण भागातून येऊन थेट मुंबईच्या चित्रपटसृष्टीपर्यंत मजल मारणे, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
जळगावच्या सांस्कृतिक वैभवात भर: एकेकाळी साहित्याच्या क्षेत्रात बहिणाबाई चौधरी यांनी जळगावचे नाव अजरामर केले, तोच वारसा आता नव्या पिढीतील कलाकार पुढे नेत आहेत. डॉ. धर्मेश पालवे आणि कुलवंतसिंह राजपूत यांच्या या जोडीमुळे बोदवड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर अधिक ठळकपणे उमटणार आहे. हा लघुपट नेमका कोणत्या विषयावर असेल आणि त्याचे चित्रीकरण कधी सुरू होणार, याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.
