एरंडोल: तालुक्यातील खडके बु! येथील बालगृहातील अत्याचार प्रकरणी महीला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा सौ. देवयानी मनोज गोविंदवार यांच्या अध्यक्ष पदाची सेवा समाप्त करण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशाने व शासनाच्या उपसचिवांच्या सहिने सदर आदेश काढण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार प्यारेलाल गुप्ता यांनी महीला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्तांशी सदर समिति बरखास्त करण्याबाबत चर्चा केली होती व वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला असता शासनाने या बाबत अखेर दखल घेऊन बहुचर्चित महीला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी गोविंदवार यांचेसह ४ सदस्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांची देखील नियुक्ती समाप्त करण्याचे आदेश काढल्याने यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
एरंडोल तालुक्यातील खडके बु! येथील बालगृहात झालेल्या मुलामुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात चव्हाट्यावर आली असता याप्रकरणात महीला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी मनोज गोविंदवार यांचे नाव संशयीत आरोपींच्या यादीत आले असताना त्यांचा एका कार्यक्रमात सत्कार देखील करण्यात आला त्यामुळे प्रत्यक्षदर्शी अवाक् झाल्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांनी आपली चूक कबूल करत बहुचर्चित समितीच्या अध्यक्षा देवयानी मनोज गोविंदवार यांच्याविरुद्ध न्यायप्रविष्ट असलेल्या गुन्ह्याची आपणास अजिबात माहिती नव्हती असे स्पष्ट केले.
परंतू प्रशासकीय लागेबांध्यांमुळे या पदावर गोविंदवार कार्यरत असल्याची चर्चा जनमानसात सूरू होती मात्र त्यांच्या नियुक्ती समाप्तीचे आदेश ऐन प्रजासत्ताक दिनीच प्राप्त झाल्यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.