खडके बालगृहातील मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी पीडितांना धमकावत असल्याची तक्रार,
आरोपींचा जामीन रद्द करण्याची एरंडोल पोलिसांकडे मागणी..!
(प्रतिनिधी) एरंडोल: तालुक्यातील खडके बुदृक येथील बालगृहातील पीडितांना आरोपी हे धमकावत असल्याची तक्रार असून तीनही आरोपींचा जामीन रद्द होण्यासाठी प्रयत्न व्हावा अशी मागणी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार पी. गुप्ता रा. जळगाव यांनी एरंडोल पोलिस स्टेशन ला दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. जळगाव जिल्ह्यातील बालकल्याण समितीमधील गुन्हे दाखल असलेल्या बालकल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी गोविंदवार, सदस्य विद्या बोरनारे, सदस्य संदीप पाटील या तीनही सदस्यांना अटक न होता जामीन मिळालेला असून ते आहेत त्याच अधिकारपदावर कार्यरत आहेत व ते आरोपी असलेल्या गुन्ह्यातील पिडीत हे त्यांच्याच ताब्यात आहेत असे एरंडोल पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे. जिल्हा महीला बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत ६, ७ व ८ जानेवारी २०२४ रोजी चाचा नेहरु बालमहोत्सवाचे आयोजन छ्त्रपती क्रिडा संकुल येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास विधी सेवा प्राधिकरण सचिव मा. उपायुक्त बालन्याय मंडळ सदस्य, बालकल्याण समिती सदस्य,अध्यक्ष तसेच अनेक अधिकारी उपस्थित होते. ६,७ व ८ जानेवारी या तीनही दिवशी जिल्हा क्रिडा संकुल येथे क्रीडांगणावर दोन मंडप उभारण्यात आले होते. एका बाजूला चाचा नेहरू बालमहोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तर दुसऱ्या मंडपाच्या बाजूला क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या. ज्या बाजूला क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या त्या मंडपाजवळ ८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास दोन ते तीन मुलींसोबत देवयानी गोविंदवार व जोशी या संवाद साधतांना दिसत आहेत. संवाद साधला जात असलेल्या बालिका खडके येथे झालेल्या अत्याचार प्रकरणामधील पिडीत बालिका आहेत व त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या गोविंदवार ह्या त्याच गुन्ह्यामधील आरोपी आहेत. असे असतांना, आरोपी हे पिडीतांसोबत १५ते २० मिनीटे चर्चा करतांना दिसत आहेत हे तेथे उपस्थित असलेल्या महीला व बालविकास विभागाचे संबंधित अधिकारी व तेथे उपस्थित असलेल्या अन्य लोकांनी ही पाहिलेले आहे. अशी तक्रार तक्रारी अर्जाव्दारे करण्यात आली आहे. गोविंदवार यांना न्यायालयामार्फत अटकपूर्व जामीन मिळालेला आहे मात्र अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर त्यांनी सदर केस मधील पिडीत/साक्षीदारास फोडण्याची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सदर प्रकरणाला कमकुवत करून वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्या अर्थी त्यांनी सर्वांसमक्ष या पिडीत मुलींसोबत चर्चा केलेली आहे म्हणजेच, यानंतर देखील आरोपी पिडितांसोबत त्यांच्या घरी/त्यांच्या सुलभ असणाऱ्या जागी जाऊन त्यांचे मतपरिवर्तन करु शकतात. गोविंदवार यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्या फिर्यादिंना फूस लावण्याचा तथाकथित प्रयत्न करतांना दिसत आहेत. असा ठपका तक्रारी अर्जात ठेवण्यात आला आहे. बालकल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी गोविंदवार, सदस्य विद्या बोरनारे,सदस्य संदीप पाटील या आरोपींचा न्यायालयात जामीन नामंजूर करण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य ते प्रयत्न करावेत अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. न्यायालयाकडून जामीन नामंजूर होताच तीनही आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पोलिस महासंचालक(म.राज्य, मुंबई), विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र,जिल्हा पोलिस अधीक्षक, जळगाव,अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाते यांना पाठविण्यात आल्या आहेत.