अनेकांना मोठ्या प्रमाणात शारीरिक कष्ट न घेता केवळ थोड्या प्रमाणात चालले तरी दम लागतो. मात्र याची करणे वेगवेगळी असू शकतात. दम लागणे हे फुफ्फुसाचे कार्य व्यवस्थीत नसल्याचे लक्षण असू शकते. अनेक वेळा काही लोकांना श्वसनविकाराचे जुनाट आजार असतात. मात्र त्याची लक्षणे जाणवल्यानंतर तपासणी केल्याशिवाय त्याचे निदान लक्षात येत नाही. तर काही लोकांना दमा असण्याची शक्यता असते. त्यावेळी मात्र ते डॉक्टरकडे जाऊन नियमित तपासणी करून घेतात. त्यावेळी श्वसनविकार तज्ज्ञ ‘पल्मोनरी फंक्शन टेस्ट, ही फुफ्फुसांच्या कार्याची तपासणी चाचणी करतात.
*पीएफटी चाचणी का करायची?*
हृद्यविकारने सुद्धा अनेकवेळा चालताना दम लागण्याची शक्यता असते. त्यामुळे श्वसनस विकार तज्ज्ञ हृदयविकार तज्ज्ञांचे मत घ्यायला सांगतात. त्यासोबत विविध प्रकारच्या ॲलर्जीमुळे सुद्धा श्वसन विकाराच्या समस्यांना रुग्णांना सामोरे जावे लागते. या सर्व श्वसन विकाराशी संबंधित आजार हे प्फुफ्फुसाच्या कार्यावर अवलंबून आहे. त्यामुळे प्फुफ्फुसांचे कार्य कशा पद्धतीने सुरू आहे, हे पाहण्यासाठी पीएफटी चाचणी महत्त्वाची ठरते.
*रुग्णाच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम :*
फुफ्फुसांच्या कार्यामध्ये अडथळा आल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. अनेकांना कधी कधी कृत्रिम पद्धतीने प्राणवायू द्यावा लागतो. काहीवेळा संसर्ग झाल्यामुळे श्वासनलिकेत कफ साठतो. तर सीओपीडी नावाचा आजार रुग्णांना झाल्याची शक्यता असते. वैद्यकीय भाषेत याला ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, असेही म्हणतात. या आजारात रुग्णाच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम पाहायला मिळतात.
*पीएफटी म्हणजे काय ?*
पल्मोनरी फंक्शन टेस्ट प्फुफ्फुसाच्या कार्याची तपासणी करणारी चाचणी आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास रुग्णाला होत नाही. डॉक्टर रुग्णाला एका विशिष्ट यंत्रामध्ये फुंकर मारायला सांगतात. ते यंत्र संगणक किंवा लॅपटॉपमधील सॉफ्टवेअरशी जोडलेले असते. त्यावर तुमच्या फुफ्फुसाचे कार्य कशा पद्धतीने आहे..? त्याचे मोजमाप आलेखाद्वारे दर्शविले जाते. त्यावर आजाराची गंभीरता डॉक्टर निश्चित करत असतात.
सध्याच्या काळात चालताना दम लागणे ही फार सर्वसामान्य समस्या आहे. यामध्ये काही प्रमुख कारणे म्हणजे धूम्रपान, प्रदूषण, चुलीवर काम करणे ही प्रमुख कारणे ज्यामुळे फुफ्फुसाच्या कार्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. अनेकांना आनुवंशिक दमा, अस्थमा असण्याची शक्यता असते. फुफ्फुसाचे कार्य मोजण्यासाठी पीएफटी चाचणी केली जाते. दिवसभरात १० ते १५ रुग्णांवर ही चाचणी आम्ही करत असतो. या चाचणीमुळे रुग्णाच्या फुफ्फुसाचे कार्यप्रमाण समजण्यास मदत होते.
— डॉ.लॅन्सलॉट पिंटो, श्वसनविकार तज्ज्ञ, हिंदुजा हॉस्पिटल.