कपाळाला हात लावून डोकेदुखी थांबविणाऱ्या अवलिया च्या शहरात ४३ समाजकंटकांमुळे वाढली डोकेदुखी..!
एरंडोल : डोक्याला हात लावून डोकेदुखी थांबविणारा अवलिया नत्थू बापू उर्फ पीर नत्थू मिया हे येथील हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान मानले जाते मात्र २२जानेवारी २०२४ रोजी रात्री एकाच समाजाच्या काही समाजकंटकांनी नत्थूबापूंवर असलेली श्रद्धा, आस्था व विश्वास यास फाटा देत दगडफेक व आक्षेपार्ह घोषणा देत दहशत निर्माण करत शहरास वेठीस धरले. या प्रकरणी २६ आरोपी जळगाव येथे जिल्हा कारागृहाची हवा खात आहेत तर १४ आरोपी अद्याप फरार असून एरंडोल पोलिस त्यांना जेरबंद करण्यासाठी शोधमोहीम राबवित आहेत.
शहरातील चुना भट्टी परीसर, अंजनी नदीवरील नवीन पूल,मुल्ला वाडा परीसर,मुजावर वाडा परीसर या ठिकाणी दंगा नियंत्रण पथकाची एक तुकडी, मुख्यालयातील काही कर्मचारी तैनात असून पोलिस निरीक्षक सतीश गोराडे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे व पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी अहोरात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजीत विविध कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्यामुळे या समाजकंटकांनी काही ठिकाणी दगडफेक करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. या घटनेत पडद्यामागील सुत्रधार कोण याचा शोध पोलिस प्रशासनाकडून घेतला जात आहे.
नत्थूबापू यांच्या हातातील काठी सामाजिक सद्भावना रुजवणारी होती याचा या समाजकंटकांना विसर पडला की काय..? बापूंची काठी ही शांतताप्रिय व हिंदू मुस्लिमांमध्ये जातीय सलोखा जपणारी असल्याचे मानले जाते मात्र ही परंपरा खंडित करण्याचे दुष्कृत्य दगडफेक व हल्ला प्रकरणात करण्यात आले. नत्थूबापू या अपप्रवृत्तींना कधीही माफ करणार नाही अशी भावना भविकांमधून व्यक्त होत आहे.