एरंडोल येथे भराव पूलाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याची महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी..!
एरंडोल: येथे धरणगाव चौफुली व दत्तमंदिराजवळ असे दोन भराव पूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर असून या पुलांमुळे एरंडोल शहराच्या वैभवात मोलाची भर पडली आहे. दोन्ही पुलांपैकी एका पूलाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मौर्य क्रांती संघटनेतर्फे महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
एरंडोल शहरालगत महामार्गावर लावलेल्या फलकांवर एरंडोल शहराचा नामोल्लेख ल ऐवजी ळ करण्यात आला आहे. ज्या ज्या ठिकाणी अश्या भाषिक चुका झालेल्या आहेत त्या त्वरीत दुरुस्त कराव्यात तसेच एरंडोल बस स्थानकापासून दत्त मंदिरापर्यंत महामार्गाच्या दोन्हीं बाजूंना गटारी व इतर संसाधनांसह समांतर रस्ते होणे आवश्यक असताना या कामी टाळाटाळ का केली जाते..? असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
समांतर रस्त्यांचा प्रश्न जनहिताचा असून जिवीत हानी टाळण्यासाठी याकडे दुर्लक्ष करणे अयोग्य आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर मौर्य क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र लाळगे यांची स्वाक्षरी आहे.निवेदनाची प्रत आ. चिमणराव पाटील यांना पाठविण्यात आली आहे.