न्यायालयीन कोठडीत असलेल्या वादग्रस्त निलंबित पोलिस निरीक्षक किरण बकाले यांना मोबाईल फोन वापरू देणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची पोलिस अधीक्षकांकडे मागणी..!
(प्रतिनिधी)
जळगाव: मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या निलंबीत पोलिस निरीक्षक आरोपी किरण बकाले न्यायालयीन कोठडीत असताना आरोपीस नियमाविरुद्ध मोबाईल फोन वापरू देणाऱ्या संबंधित दोषी आढळणारे कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य नियमानुसार कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार पी. गुप्ता रा. जळगाव यांनी पोलिस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
वादग्रस्त निलंबीत पोलिस निरीक्षक व मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी किरण बकाले यांना न्यायालयात हजर केल्यानंतर धुळे कारागृहात वर्ग करण्यात आले असता एका वृत्त पत्रातील वृत्तानुसार बकाले यांना मोबाईल फोन चा वापर करू देण्यात आला. पोलिस ठाण्यात व कारागृहाच्या आवारात इअर बड्स व्दारे तर कधी इअर बड्स काढून मोबाईल व्दारे संभाषण करतानाचे फोटो सदर वृत्तपत्रात झळकले त्यामुळे आरोपीची चांगलीच बडदास्त सदर कर्मचारी व अधिकारी यांनी ठेवल्याचे कळल्याने कायद्यान्वये आरोपी हा पोलिस अथवा न्यायालयीन कोठडीत असो त्याला मोबाईल/ ब्लुटुथ वापरता येत नाही. ज्यांच्या कस्टडीत आरोपी आहे त्यांनी वापरू द्यायला नको असे असतांना आरोपीस मोबाईल चा वापर करू दिल्या प्रकरणी सविस्तर चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई व्हावी असे दिपककुमार गुप्ता यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे.