एरंडोल तहसील कार्यालयाची जूनी ब्रिटिशकालिन इमारत होणार इतिहासजमा, नविन सुसज्ज इमारत होणार..!
एरंडोल: ब्रिटिशांच्या कारकीर्दीत १३२ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली येथील तहसील कार्यालयाची तत्कालीन दगड व चून्यात बांधण्यात आलेली इमारत जमीनदोस्त होणार असून त्या जागेवर नविन अद्ययावत व सुसज्ज अशी इमारत बांधण्यात येणार आहे.
दरम्यान,
तहसील कार्यालयातील सर्व दप्तरे व फर्निचरसह संपूर्ण तहसील कार्यालय राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात टेलिफोन एक्सचेंज च्या इमारतीत स्थलांतरील होणार आहे. नविन इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे तोवर तहसील कार्यालयाचे कामकाज हे बी.एस.एन.एल च्या इमारतीत चालणार आहे. नव्या तहसील कार्यालयाच्या इमारतीमुळे एरंडोल शहराच्या सौंदर्यात मोलाची भर पडणार आहे.
एरंडोल हे तालुक्याचे शहर असून छत्रपती संभाजीनगर ते शिरपूर राज्य महामार्गालगत अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ई.सन १८९२ साली बांधण्यात आलेली
तहसील कार्यालयाची इमारत असून या इमारतीत गेल्या १३२ वर्षांपासून कामकाज सुरू आहे मात्र बदलत्या काळानुसार व परिस्थितीनुसार येथे तहसील कार्यालयाची नवी इमारत उभारण्याचा शुभारंभ लवकरच होणार आहे.
नव्या इमारतीत तळमजल्यावर उपकोषागार कार्यालय, पार्किंग व्यवस्था व कॅन्टीन इत्यादी सोयीसुविधा असणार आहेत. पहिल्या मजल्यावर महसूल विभागाच्या सर्व शाखा, तहसीलदार दालन, नायब तहसीलदार दालन, कॉन्फरन्स हॉल,रेकॉर्ड रूम इत्यादी सोयी असणार आहेत.
विशेष म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय दुसऱ्या मजल्यावर राहणार असून त्यांचे दालन नायब तहसीलदारांचे दालन व्हिडिओ कॉन्फरन्स रूम व इतर सोयीसुविधा असणार आहेत.
बांधण्यात येणाऱ्या नव्या इमारतीत तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय एकाच ठिकाणी येणार असल्यामुळे निरनिराळ्या कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचे हेलपाटे वाचणार असून वेळेवर कामे होतील अशी अपेक्षा आहे.
सदर इमारतीच्या बांधकामासाठी १३ कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. या बांधकामासाठी अठरा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
विशेष हे की,
इको फ्रेंडली सह अत्याधुनिक सोयीसुविधा या नव्या इमारतीत असणार आहेत. विशेषतः लिफ्ट ची देखिल सुविधा उपलब्ध होणार आहे.