(प्रतिनिधी)
चाळीसगाव: येथे एका माजी नगरसेवकावर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांकडून अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली.
महेंद्र(बाळू) मोरे असे गोळीबारात जखमी झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव असून ते हनुमानवाडी भागातील आपल्या कार्यालयात बसलेले असतांना सायंकाळी पावणेपाच वाजता तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांकडून गावठी कट्ट्यातून तीन ते चार राऊंड फायर करण्यात आल्यामुळे ते जबर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेचे एक सी.सी.टी.व्ही फुटेज समोर आले असता पाच हल्लेखोर एका चारचाकी वाहनातून उतरले गोळ्या झाडल्या नंतर ते फरार झाले असल्याचे कळते.त्यांनी रुमालाने तोंड झाकले असल्याचे समजते. सदर हल्ला हा पूर्ववैमनस्यातून घडल्याची सर्वत्र चर्चा आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.